वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

FAQ व्हिडिओ:

"प्रिव्हेन्शन प्रोजेक्ट डुन्केल्फेल्ड" मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट ह्यांनी FAQ (वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना दिलेली उत्तरे) यांच्यासाठी लिंक:

Medical doctors and clinical psychologists of "Prevention Project Dunkelfeld" (https://www.dont-offend.org/) answer "Frequently Asked Questions".

पीडोफिलिया म्हणजे काय? हेबेफिलिया म्हणजे काय?

अजून वयात न आलेल्या अल्पवयीन मुलामुलींबद्दल प्राधान्याने वाटणाऱ्या लैंगिक आकर्षणाचे वर्णन करणारा शब्द म्हणजे पीडोफिलिया - शारीरिक विकासाच्या टप्प्यांचा विचार करता ज्या मुलामुलींच्या शरीरामध्ये तारुण्याच्या कोणत्याही खाणाखुणा दिसत नाहीत अशाी लहान मुले-मुली (साधारणपणे, १०-११ वर्षे वयापर्यंतची मुले-मुली). म्हणून अजून वयात न आलेल्या मुला-मुलींच्या शरीरयष्टीबद्दल लैंगिकदृष्ट्या तीव्र आणि सततचे आकर्षण वाटत राहणे, ही पीडोफिलियाची व्याख्या होय.

नुकत्याच वयात येणाऱ्या मुलामुलींबद्दल प्राधान्याने वाटणारे लैंगिक आकर्षण म्हणजे हेबेफिलिया. उदाहरणार्थ, ज्या मुलामुलींच्या शरीरावर तारुण्याच्या खुणा आधीच दिसू लागल्या आहेत (साधारणपणे, ११-१४ वर्षे वयापर्यंतची मुले-मुली), जसे कि मुलांमध्ये आवाज फुटणे, मुलींमध्ये स्तनांचा आकार वाढू लागणे वगैरे.

आपल्या अशा प्रवृत्तीमुळे ह्या व्यक्तींना प्रचंड क्लेश सोसावे लागतात; वैद्यकीय मदतीची गरज पडावी, इतक्या तीव्रतेचे हे दुःख असते.

वयात न आलेल्या अल्पवयीन मुलामुलिंबद्दल किंवा नुकत्याच वयात येणाऱ्या मुलामुलिंबद्दल लैंगिक आकर्षण वाटते याचा अर्थ असा नाही कि हे लोक लैंगिक हल्ले करतात किंवा लहानमुलांचा वापर करून तयार केलेल्या लैंगिक चित्रफिती आपोआपच इन्टरनेटवर बघतात (तथाकथित 'चाइल्ड पोर्नोग्राफी'). म्हणूनच पिडोफिलीया आणि हेबेफिलीया हे वाक्प्रचार मुलांवरील लैंगिक अत्याचारापेक्षा निराळे आहेत हे निक्षून लक्षात घ्यायला हवे. गुन्हेगारी कायद्यानुसार "बाल लैंगिक अत्याचार" ही शब्दयोजना म्हणजे निव्वळ लहान मुलामुलिंबरोबर/त्यांच्याशी संबंधित केलेले लैंगिक वर्तन होय; उलटपक्षी पिडोफिलीया किंवा हेबेफिलीया हे अल्पवयीन मुलामुलिंबद्दल किंवा नुकत्याच वयात येणाऱ्या मुलामुलिंबद्दल वाटणाऱ्या लैंगिक आकर्षणासाठी किंवा उत्तेजनेविषयी वापरण्यात येणारे शब्दप्रयोग आहेत.

निदान कसे केले जाते?

प्रदीर्घ वैद्यकीय मुलाखतीच्या माध्यमातून मिळालेल्या सविस्तर माहितीच्या आधारावर पिडोफिलीया किंवा हेबेफिलीयाचे निदान केले जाऊ शकते. अशा मुलाखतीमध्ये व्यक्तीच्या लैंगिक अनुभव आणि वर्तना विषयी सखोल आणि सविस्तर अशी माहिती गोळा केली जाते. या प्रक्रियेत इतर पूरक माहिती गोळा केली जाऊ शकते, उदाहरणार्थ, इतर चाचण्या, अतिरिक्त प्रश्नावली वगैरे.

परंतु ट्रबल्ड डिझायर च्या माध्यमातून पूर्ण केलेल्या प्रश्नावली आणि चाचण्या ह्या केवळ निदानाला पूरक अशा प्रक्रिया आहेत, आणि प्रत्यक्ष वैद्यकीय मुलाखतीच्या ऐवजी संपूर्ण विश्वासाने वापराव्यात, एवढी अचूकता त्यांच्यात असेल असे नाही.

पिडोफीलिया किंवा हेबेफिलियाचे निदान करण्यासाठी जरूर ती योग्यता कोणाकडे असते?

वैद्यकीय किंवा मानसशास्त्रातील अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून गुणवत्ता प्राप्त केलेली तज्ञ व्यक्ती पिडोफीलिया किंवा हेबेफिलियाचे निदान करू शकते. तथापि, जगभरातील अनेक व्यावसायिक सेकसॉलॉजिकल इन्स्टिट्यूटसच्या मतानुसार लैंगिक विकृतींचे अचूक निदान करण्याकरिता तज्ञ व्यक्तीला सेक्स्चुअल मेडिसिन आणि त्यामधील उपचार यांच्यातील आणखी क्षमता आणि कौशल्ये जरुरीचे आहे. कारण अद्याप कोणत्याही विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात आणि वैद्यकीय किंवा मानसशास्त्रीय प्रशिक्षणात लैंगिक आजारांची तपासणी किंवा उपचार या गोष्टींचा समावेश नाही.

पिडोफीलियाच्या आणि हेबेफीलीयाच्या लैंगिक प्राधान्यांची कारणे कोणती आहेत?

लैंगिक आरोग्य तज्ञांनी प्रौढांना वाटणाऱ्या लहान मुलामुलींप्रती किंवा पौगंडावस्थेतील मुलामुलींप्रती वाटणाऱ्या लैंगिक आकर्षणाबाबतच्या कारणमीमांसेवर चर्चा करतांना ह्या विषयाशी निगडित वेगवेगळ्या घटकांचा विचार केलेला आहे. (उदाहरणार्थ मेंदूचा विकास, संप्रेरक आणि चेतातंतूंशी संबंधित विकास, बालवयातील नातेसंबंध आणि आपुलकी, दृढता यांचे अनुभव, बालपणात झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटना). एकंदरीत, पिडोफिलिक किंवा हेबेफीलीक लैंगिक प्राधान्याच्या संदर्भात त्याची कारणे अथवा या आजाराचे सुस्पष्ट स्वरूप अजून तरी आपल्या हाती नाही; त्यासाठी अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे आणि तसे ते चालूपण आहे.

किती लोकांना पीडोफिलिक किंवा हेबेफिलिक या प्रकारात मोडणाऱ्या इच्छा असतात? त्यामध्ये महिला किती प्रमाणात असतात?

जर्मनीमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, यामध्ये पुरुषांचे प्रमाण 3 ते 6 टक्के दरम्यान आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पिडोफिलिक किंवा हेबेफिलिक या प्रकारात मोडणाऱ्या पुरुषांचे प्रमाण म्हणजे ज्यांना अल्पवयीन किंवा नुकत्याच वयात येणाऱ्या मुलांमुलींच्या बद्दल लैंगिक भावना होत्या किंवा प्रत्यक्ष संपर्क होता, अशांचे प्रमाण ३ ते ९ टक्के आढळले. तरीही एकूण लोकसंख्येच्या तुलनेत पिडोफिलिक किंवा हेबेफिलिक या प्रकारात मोडणाऱ्यांचे प्रमाण किती आहे, हे दर्शवणारी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही, कारण या विषयावर सर्वंकष एपिडेमियोलॉजिकल सर्व्हे (रोगपरिस्थिती विज्ञान सर्वेक्षणे) करण्यात आलेली नाहीत. या विषयावर अजूनही शास्त्रीय संशोधने सुरु आहेत.

सध्याच्या माहितीच्या आधारे असे दिसून येते की, एकंदरीत पिडोफिलिक किंवा हेबेफिलिक या प्रकाराचे निदान झाले त्यांच्यात बहुतांश पुरुषच होते. बर्लिनमधे चालू असलेल्या बाल लैंगिक शोषणाच्या प्रतिबंधात्मक प्रकल्पाच्या अंतर्गत असे दिसून आले की, फार थोड्या स्त्रियांदेखील आपण होऊन तपासणीसाठी पुढे आल्या मात्र त्यातल्या अजूनच थोड्यांना पिडोफिलियाचे किंवा हेबेफिलियाचे निदान लागू झाले.

पीडोफिलियाचे निदान अचूकरीत्या व्हावे म्हणून आवश्यक असलेले निकष आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त नैदानिक मार्गदर्शक तत्वांच्या आधारे तयार केले गेले आहेत. येथे सर्वात महत्वाचा निकष म्हणजे वयात येण्यापूर्वीच्या अल्पवयीन मुलांमुलींच्या किंवा नुकत्याच वयात येत असलेल्या मुलांमुलींच्या शरीरयष्टीमुळे प्रौढ व्यक्तिला लैंगिक उत्तेजना येणे हा आहे.

बाल लैंगिक शोषण करणारे किंवा बालकांशी लैंगिक गैरवर्तनाचे गुन्हे करणारे सर्व लोक पीडोफिलियाने किंवा हेबेफिलियाने ग्रस्त असतात का?

नाही. लहान मुलांमुलींबद्दलचे आणि/किंवा नुकत्याच वयात येणाऱ्या मुलांमुलींबद्दलचे लैंगिक आकर्षण वाटून बाल लैंगिक शोषण करणारे लोक, आणि प्रौढ व्यक्तीबद्दल लैंगिक आकर्षण वाटूनही मुलांचा वापर करणारे लोक यांच्यातला फरक स्पष्ट करणे आवश्यक आहे. हे दुसऱ्या प्रकारातले लोक इतर काही अडचणींमुळे पर्यायी कृती म्हणून, किंवा मानसिक आजारांमुळे सहसा असे गुन्हे करत असतात.

पिडोफिलिक किंवा हेबेफिलिक लैंगिक प्राधान्य असणारे सगळेच जण मुलांविरुद्ध लैंगिक गैरवर्तनाचे गुन्हे करतात का?

नाही, नक्कीचनाही.

बाल लैंगिक चित्रफितीचा/पोर्नोग्राफीचा वापर केल्याने मुलांवर लैंगिक अत्याचार करून बघण्याची इच्छा वाढू शकते का?

बाल-लैंगिक चित्रफितींचा वापर केल्याने बाल-लैंगिक शोषण करून बघण्याची इच्छा किती प्रमाणात प्रबळ होऊ शकते, ही शक्यता निःसंशयपणे मोजता येणे आजवरच्या संशोधनाला शक्य झालेले नाही. तरीही, केवळ अशा चित्रफितींचा वापर करणे हा देखील गुन्हाच आहे, आणि बाल-लैंगिक शोषणाचा तो एक गंभीर प्रकार आहे, हे समजले तर बाल लैंगिक शोषण प्रतिमांच्या वापरापासून दूर ठेवणे हे उपचारात्मक प्रयत्नांचे आणखी एक लक्ष्य आहे हे लक्षात येईल.

"हेलफेल्ड" आणि "डुंकेलफेल्ड" या जर्मन शब्दांचा अर्थ काय?

कायदेशीर प्रणालीद्वारे नोंदणी केलेल्या गुन्ह्यांना "लाइट फील्ड" (मराठी: प्रकाशित क्षेत्र) मधील गुन्हा म्हणून गृहीत धरले जाते (जर्मनमध्ये "हेलफेल्ड"). परंतु, बालकांविरुद्ध केल्या गेलेल्या लैंगिक गुन्ह्यांची अधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात नोंदच केली जात नाही, आणि त्यामुळे ते गुन्हेगारीच्या आकडेवारी मध्ये दिसत नाहीत. गुन्हेगारीच्या विषयाच्या शास्त्रात, अशी कृत्ये "काळ्या किंवा गडद क्षेत्रातील गुन्हे" असे संबोधले जातात (जर्मनमध्ये "डुंकेलफेल्ड"; मराठीत "अंधारातले क्षेत्र"). समाजाच्या दृष्टीआड / इतरांना अंधारात ठेऊन चालू असलेल्या कुठल्याही गोष्टीला ही संज्ञा लागू पडेल, असे म्हणता येईल आणि दरम्यानच्या काळात "डुंकेलफेल्ड" ही संज्ञा बाल लैंगिक शोषणाच्या प्राथमिक प्रतिबंधासाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांच्या समुदायात एक ब्रँड / खास चिन्ह म्हणून सुस्थापित झाली आहे.

अशा लोकांना उपचार देऊ करणे अथवा तसा प्रस्ताव ठेवणे हे अपराध्यांना पाठीशी घालण्याचा किंवा त्यांना संरक्षण देण्याचा एक मार्ग आहे, असे होत नाही का?

ज्यांना पिडोफिलिक किंवा हेबेफिलिक लैंगिक प्राधान्य आहे, आणि ज्यांना त्यांच्या समस्येची जाणीवही असून ते मदतही शोधत आहेत अशा व्यक्तींना हे जे उपचार देऊ केले जात आहेत, त्या उपचारांचा उद्देश हा अल्पवयीन किंवा नुकत्याच वयात येणाऱ्या मुलांमुलींच्यावरील लैंगिक अत्याचार होण्याआधीच त्याचा प्राथमिक प्रतिबंध करणे, तसेच बाल लैंगिक चित्रफितिंचा किंवा प्रतिमांचा वापर करण्यापासून त्यांना रोखणे हा आहे. अशाप्रकारे 'प्रिव्हेन्शन नेटवर्क'च्या "Kein Täter Werden" (म्हणजे 'गुन्हेगार होऊ नका') अशासारखे उपचारात्मक कार्यक्रम अल्पवयीन आणि नुकत्याच वयात येणाऱ्या मुलांमुलींचे लैंगिक अत्याचाराला बळी पडण्यापासून संरक्षण करण्यात - हा प्रश्न उद्भवण्याच्या आधीच रक्षण करण्यात - मोलाचे योगदान देत आहेत. अशा रीतीने पुन्हा पुन्हा होणारे अत्याचार रोखणे आणि अत्याचारित बालकांवरील चालूच राहणाऱ्या अपरिमित त्रासाला खीळ घालणे या गोष्टी साधल्या जात आहेत. ट्रबल्ड डिझायर हे एक ऑनलाइन साधन आहे जे प्रत्यक्ष थेरपीची जागा घेऊ शकत नाही तरीही मुलांकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित झालेल्या लोकांसाठी या साधनाच्या वापरातून सोप्या पद्धतीचे स्वयं उपचार घेण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

ही थेरपी किंवा उपचारतंत्र कसे काम करते?

मानसिक, लैंगिक आणि औषधे या सगळ्यांचा एकत्रित विचार करून उपचारपद्धती योजली जाते.
लैंगिक गुन्हे पुनःपुन्हा घडू नयेत, म्हणून संशोधनाने निर्णायकरीत्या ठरवलेल्या आयुष्याच्या क्षेत्रांमधील नेमक्या भागांवर थेरपीचे सुरुवातीचे टप्पे म्हणून लक्ष केंद्रित केले आहे:

• स्वतःच्या वर्तणुकीवर कायमस्वरुपी नियंत्रण ठेवण्यासाठी अंत:प्रेरणा मजबूत करणे
• मदतीचे स्रोत मजबूत करणे / बळकट करणे
• स्वतःच्या कृतीची किंवा वर्तनाची जबाबदारी घेणे
• स्वत:विषयीच्या नकारात्मक विचार आणि भावनांच्या समस्यांवर काम करणे
• आपल्या जीवनातील समस्यांशी यशस्वीरित्या सामना करायला आणि भावनांचे व्यवस्थापन करायला शिकणे आणि त्यातून लैंगिक आवेग नियंत्रित करण्याची क्षमता प्राप्त करणे
• धोकादायक परिस्थिती ओळखणे आणि तिचे व्यवस्थापन
• लैंगिक गुन्ह्यांपासून दूर राहून जीवनात आवश्यक असलेल्या सामाजिक आणि वैचारिक क्षमतांचा विकास करणे
• आंतरव्यक्तीक नातेसंबंधात आवश्यक असलेली कौशल्ये सुधारणे (उदा. सोशल नेटवर्क्स (परिचितांचा परीघ) तयार करणे किंवा सुस्थिर करणे; प्रौढ व्यक्तीबरोबरील जवळिक साधण्याची क्षमता विकसित करणे)
• भविष्यासाठीचा योग्य दृष्टीकोन तयार करणे आणि त्याचा विकास करणे

ऑनलाईन उपचार देणाऱ्या ट्रबल्ड डिझायर ह्या उपचार पध्दतीला बर्लिन, जर्मनी येथील डुंकेलफेल्ड या बाललैंगिक अत्याचाराला प्राथमिक प्रतिबंध करणाऱ्या कार्याक्रमाच्या गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक अनुभवाचा आधार मिळालेला आहे आणि त्यातून बालकांबाबत लैंगिक आकर्षणावर मात करण्याकरीता स्वयंउपचार घेण्याची सुविधा देऊ केली आहे.

थेरपी यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?

जेव्हा चिकित्सक / उपचार देणारा (थेरपिस्ट) आणि उपचार घेणारा दोघे मिळून त्याना नेमून दिलेली सर्व कामे व्यवस्थितपणे पार पाडतात, मुख्यतः तेव्हा उपचार/ थेरपी यशस्वी होते.

उपचारांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीने दृष्टीकोनातला मोकळेपणा, उपचाराकरिता नियमित सहभाग, आणि निर्णयाची जबाबदारी घेण्याची तयारी या सगळ्या गोष्टी पाळल्यास उपचारांच्या ध्येयावर प्रत्यक्ष परिणाम होतो. या ठिकाणी मुलांशी लैंगिक गैरवर्तन आणि बाल लैंगिक चित्रफिती किंवा प्रतिमांचा वापर या दोन गोष्टी न करण्याचा निश्चय निर्णायक ठरतो.

चिकीत्सकाच्या बाजूचा विचार करायचा झाल्यास उपचार करण्यासाठीचे त्याचे प्रशिक्षण, त्याच्या जवळ असलेली लैंगिक विकारांची तपासणी आणि त्यावर उपचार करण्याची कौशल्ये आणि नियमित देखरेख या गोष्टी यशस्वी उपचारांकरिता आवश्यक असतात.

पीडोफिलिया किंवा हेबेफिलिया असलेले लोक बाल लैंगिक चित्रफितींचा किंवा प्रतिमांचा वापर हा स्वतःच्या लैंगिक गरजांच्या पूर्तीसाठी पर्याय म्हणून समजतात का?

बाल लैंगिक चित्रफितींचा किंवा प्रतिमांचा (तथाकथित अश्लील बाल चित्र-फितींचा/चाईल्ड-पोर्नोग्राफी) वापर मुलांबरोबर प्रत्यक्ष शारीरिक संपर्क न येता लैंगिक गरजांचे समाधान करण्याची शक्यता उपलब्ध करून देतो.

तथापि, बाल लैंगिक चित्रफितींचे/प्रतिमांचे उत्पादन आणि वितरण त्यामध्ये दाखवलेल्या बालकांच्या प्रत्यक्ष लैंगिक शोषणावरच आधारित असतात, याची जाणीव ते बघणा-याला बहुतेक वेळा नसते हा मूलभूत प्रश्न आहे. बाल लैंगिक चित्रफितींचा/प्रतिमांचा वापर करणाऱ्या काही जणांना मात्र ही जाणीव असते, आणि त्यांना त्याविषयी वाईटही वाटते.

सहभागी व्यक्तीने जर लैंगिक शोषणाची कृती केली, तरी रुग्णाबाबतच्या गोपनीयतेचे पालन केले जाईल का?

जर्मनीमध्ये बाल-लैंगिक शोषणाच्या सर्व सध्या सांगितलेल्या/रिपोर्ट केले गेलेल्या आणि पूर्वी घडलेल्या घटनांबाबत चिकित्सकांना व्यायवसायिक गोपनीयता राखणे बंधनकारक आहे. जर्मनीमध्ये कोणताही अनिवार्य अहवाल (mandatory reporting) कायदा नाही. गोपनीयतेचा भंग म्हणजे कायदेशीर अपराध आहे. रुग्णां संबंधित गुप्तता हे प्रतिबंधात्मक पध्दतीच्या प्रकल्पाचा आधार आहे. अशा प्रकारे, (विशेषतः आणखी वाढती) गुन्हेगारी रोखण्यासाठी, मुलांविषयी असणाऱ्या लैंगिक आकर्षणावर मात करू इच्छिणाऱ्या लोकांना - मग भले ते अधिकाऱ्यांना ठाउक नसले तरीही - उपचार देऊ केले जाऊ शकतात. 

इतर देशांमध्ये अशा गुन्ह्याची कायदेशीर नोंद करणे बंधनकारक आहे. भूतकाळात घडून गेलेल्या गुन्ह्याची तक्रार देखील संबंधित अधिकाऱ्याकडे केली जाऊ शकते किंवा करावीच लागते. ज्या व्यक्तींन कडून पूर्वीच हा अपराध / गुन्हा घडलेला आहे अशा व्यक्तींना उपचार उपलब्ध होणार नाहीत. प्रतिबंधात्मक दृष्टिकोनातून, जर्मनीतील कायदेशीर परिस्थिती (कोणतेही अनिवार्य अहवाल कायदा नसणे) म्हणूनच फार फायदेशीर आहे.

जिथे स्वतःला किंवा इतरांना नजीकच्या काळात तीव्र (acute) धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण होते, तिथे धोक्याची शक्यता असणाऱ्या माणसाचे किंवा माणसांचे हित सर्व-प्रथम लक्षात घेतले जाते. अशा प्रसंगी, थेरपिस्ट आणि सहभागी व्यक्ती मिळून एकत्र काम करून धोरण/बेत ठरवतात की हा नजीकचा तीव्र धोका कशा पद्धतीने संपुष्टात आणता येईल.